Type Here to Get Search Results !

विटनेर येथे नवरात्रोत्सवात अ. भा. अंनिसचा प्रबोधनात्मक कार्यक्रम; भोंदूबाबांच्या हातचालाखीचे प्रयोग दाखवत जनजागृती!


विटनेर  ता जळगाव (विशेष प्रतिनिधी):

येथील पाटील वाड्यातील वक्रतुंड मंडळाच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) अंधश्रद्धा निर्मूलन, भोंदूबाबांची फसवेगिरी आणि मानसिक आरोग्य या विषयांवर जनजागृतीपर मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अ. भा. अंनिसचे प्रसिद्धी प्रमुख श्री. महेश शिंपी यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी समितीची कार्यपद्धती आणि ध्येयधोरणांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.


वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रात्यक्षिकांची जादू

कार्यक्रमात जिल्हा संघटक श्री. विनोद सपकाळे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून दिले. भोंदू बाबा लोकांच्या भाबडेपणाचा कसा गैरफायदा घेतात, हे त्यांनी थेट प्रयोगांद्वारे दाखवून दिले. यामध्ये प्रामुख्याने:




  • भूत पकडण्याचे दावे उघडे पाडणे,
  • पाण्यावर दिवा पेटवून दाखवणे,
  • मंत्रांच्या सामर्थ्याने होम पेटवण्यामागील रासायनिक सत्य उलगडणे,

यांसारखी अनेक प्रात्यक्षिके सादर करून चमत्कारांमागील हातचालाखी आणि वैज्ञानिक सत्य त्यांनी मांडले. अंधश्रद्धेमुळे नागरिकांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण कसे होते, यावर प्रकाश टाकत त्यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन केले.



मानसिक आरोग्याची जपणूक आणि नवरात्रीचा खरा अर्थ

यानंतर डॉ. जयेश वाल्हे यांनी 'मानसिक आरोग्य व काळजी' या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. नवरात्रीतील देवीच्या नऊ रूपांचा सामाजिक व व्यावहारिक संदर्भ स्पष्ट करताना ते म्हणाले, "जसा आपण नवरात्रात शारीरिक उपवास करतो, तसाच मनातील नकारात्मकता आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी 'मानसिक उपवास' करणेही काळाची गरज आहे." मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करून त्यांनी मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


मंडळाचे सहकार्य व ग्रामस्थांचा प्रतिसाद

हा प्रबोधनात्मक उपक्रम यशस्वी करण्यासाठी वक्रतुंड मित्र मंडळाचे सदस्य श्री. भूषण भाऊ, गौरव पाटील, नवल परदेशी, श्री. सचिन पाटील, श्री. अमोल पाटील, श्री. राजेश पाटील, श्री. उमेश पाटील, डॉ. पंकज यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला विटनेर परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



Maharashtra Pulse News 🗞️ 


Post a Comment

0 Comments