Type Here to Get Search Results !

राजपूत परदेशी समाजात रिटर्न गिफ्टची अभिनव संकल्पना; विटनेर येथील शिराह परिवाराचा उपक्रम ठरला चर्चेचा विषय



जळगाव तालुक्यातील विटनेर : येथे दिनांक २२ जून २०२६ रोजी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात राजपूत परदेशी समाजातील पारंपरिक आहेर प्रथेला आधुनिकतेची जोड देत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.


राजपूत परदेशी समाजात आहेर करणाऱ्या नातेवाईकांना रिटर्न गिफ्ट म्हणून ताट, वाटी, टोपली, भांडी आदी घरगुती वस्तू देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन आणि लोकांच्या प्रत्यक्ष गरजेचा विचार करून शिरा परिवार, विटनेर यांनी या पारंपरिक पद्धतीत सकारात्मक बदल करत प्रत्येक आहेरकर्त्याला Citizen कंपनीची दर्जेदार छत्री भेट म्हणून दिली.


या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नातेवाईक व उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अनेकांनी ही भेट अत्यंत उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली. राजपूत परदेशी समाजात भांड्यांऐवजी छत्री रिटर्न गिफ्ट देण्याचा हा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच झाल्याचे सांगितले जात असून, या उपक्रमाची समाजभर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.


या संकल्पनेचा सकारात्मक प्रभाव समाजात दिसून येत असून, भडगाव येथील हरी बडजावंत यांच्या २० तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्यात तसेच लोहटार येथील श्याम पाकळ यांच्या २६ तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्यातही रिटर्न गिफ्ट म्हणून छत्री देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या अभिनव उपक्रमाला समाजात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.


समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या दूरदृष्टीपूर्ण व उपयुक्त संकल्पनेचे कौतुक करत शिरा परिवार, विटनेर यांचे अभिनंदन केले. परंपरा जपत काळाची गरज ओळखून केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही अशा उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण रिटर्न गिफ्टच्या संकल्पना अधिक प्रमाणात स्वीकारल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

Post a Comment

0 Comments