जळगाव : केळी पीक विमा प्रकरणात जिल्ह्यातील सुमारे २७ हजार खातेदारांना कृषी विभागाने नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही केवळ सुमारे ३ हजार खातेदारांनीच आपले खुलासे सादर केले आहेत. त्यामुळे उर्वरित सुमारे २४ हजार खातेदारांनी नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
कृषी विभागाकडून सुरुवातीला २२ मार्चपर्यंत खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना संधी देण्यासाठी आणखी ४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. एकूण प्रकरणात सुमारे ८८ टक्के खातेदारांनी अद्यापही उत्तर दिलेले नाही.
दरम्यान, जिल्ह्यात प्रत्यक्ष केळी लागवड नसताना काही ठिकाणी पीक विमा काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुमारे ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड असल्याचा अंदाज असताना, २७ हजारांहून अधिक खातेदारांनी विमा घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
खुलासा सादर न करणाऱ्या खातेदारांवर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र पल्स न्यूज

Post a Comment
0 Comments