Type Here to Get Search Results !

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जी. एच. रायसोनी महाविद्यालयात 'ज्ञानक्षेत्र' भेट संपन्न!


 महाराष्ट्र पल्स न्यूज

(शैक्षणिक वृत्त विशेष)

जळगाव:

धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरच्या विविध दिशा व संधींची अचूक माहिती व्हावी, या उद्देशाने एकदिवसीय 'ज्ञानक्षेत्र' अभ्यास भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


जी. एच. रायसोनी ज्युनिअर कॉलेज तथा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सोनल तिवारी व निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ही भेट आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करून अल्पोपहार देण्यात आला.


 त्यानंतर आयोजित दोन तासांच्या विशेष मार्गदर्शन सत्रात प्राचार्या सौ. सोनल तिवारी यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील यांनी आपल्या मनोगतातून वेळीच मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व विशद केले. "मार्गदर्शनाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दिशा चुकू नये, याच उदात्त भावनेतून ही ज्ञानक्षेत्र भेट घडवून आणली आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यालयाचे शिक्षक श्री. तीर्थराज इंगळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले.


सत्रात पुढे प्रा. श्री. रफिक शेख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणीतून विद्यार्थ्यांची मने जिंकली. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक श्री. राहुल यादव यांनी 'न्यूटनच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यांत आंतरिक ज्ञानबल असते' हे पटवून देत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (PPT) दहावीनंतरच्या सर्व शाखांची माहिती करून दिली. 

शेवटी महाविद्यालयाचे सिनिअर क्लर्क श्री. अनिल सोनार यांनी वास्तववादी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.



दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक व्यायामशाळा व भव्य क्रीडांगणाची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. दिवसभराच्या या ज्ञानपूर्ण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या बसद्वारे सुखरूप घरी पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली.

या ज्ञानक्षेत्र भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी रायसोनी महाविद्यालयाचे प्रा. श्री. संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. आर. पी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. व्ही. डी. पाटील, श्री. पी. के. राजपूत, श्री. एस. आर. पाटील, श्रीमती नीलिमा पाटील व श्रीमती प्रियांका पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी नवी उमेद व आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र पल्स न्यूज – शिक्षणाचा नवा दृष्टिकोन)

न्यूज संपादक श्री नवल परदेशी 


(


Post a Comment

0 Comments