Type Here to Get Search Results !

माजी विद्यार्थ्याकडून गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप ची.वेदिकाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विधायक उपक्रम


वेदिकाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विधायक उपक्रमात गणवेशप्राप्त विद्यार्थी, शिक्षकवृंद व वराडे परिवारातील आजी-आजोबांसह उपस्थित मान्यवर.” 📸✨


पळासखेडे मिराचे - ( निळकंठ पंढरीनाथ पाटील विदयालय)

"ज्यांच्या डोळ्यात आसू येतात, तेच लोक इतरांचे अश्रू पुसू शकतात. अशी भावसंपन्न पिढी आपल्याला घडवायची असेल, तर एका हातात तंत्रज्ञान आणि दुसऱ्या हातात तत्त्वज्ञान द्यावे लागेल; आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करावी." या विचारातून प्रेरणा घेत निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा गावातील CRPF जवान "वसुदेव सुतंदेव" श्री ज्ञानेश्वर हिरालाल वराडे यांनी आपली कन्या चि.वेदिका ज्ञानेश्वर वराडे हिच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयातील १० गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.


“मुख्याध्यापकांच्या हस्ते शुभेच्छांचा पुष्पगुच्छ स्वीकारताना चि. वेदिका.” 💐❤️

यावेळी वाढदिवसाची बर्थडे गर्ल चिमुकली चि. वेदिका वराडे हिने उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांसमोर आपल्या गोड आणि भावस्पर्शी शब्दांत मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, "आजचा माझा वाढदिवस मी माझ्या परिवारासोबत आणि तुमच्यासोबत साजरा करत आहे. ज्या मित्राला मदतीची गरज आहे, त्या मित्रासोबत मी माझा वाढदिवस साजरा करत आहे. कारण निस्वार्थ सेवेतून आणि इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जे समाधान मिळते ना, ते महागड्या पार्टीतून किंवा मोठ्या उत्सवातून मिळणे शक्य नाही."



पुढे चिमुकल्या वेदिकाने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, "तुमचाही वाढदिवस फुगे फुगवून किंवा केक कापून साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करून साजरा करा. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यातच खरा आनंद आहे." वेदिकाच्या या निरागस पण तितक्याच विचारप्रवर्तक मनोगताने उपस्थित सर्वांची मने जिंकली.


या प्रसंगी वेदिकाचे आजोबा आदरणीय श्री. हिरालाल तुकाराम वराडे व आजी सौ. सुनंदाबाई हिरालाल वराडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तीर्थराज इंगळे सर यांनी आपल्या भारदस्त, प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या सुंदर सूत्रसंचालनातून वराडे परिवाराचा सामाजिक बांधिलकीचा हा विधायक उपक्रम उपस्थितांपर्यंत  प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

शिक्षकांकडून वराडे आजी-आजोबां कृतज्ञतापूर्वक सत्कार व आभार स्वीकारताना.” 💐🙏

                  

माजी विद्यार्थी श्री.ज्ञानेश्वर वराडे यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या विधायक व प्रेरणादायी उपक्रमाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील सर व पर्यवेक्षक श्री. आर. पी. पाटील सर यांनी विद्यालयाच्या वतीने श्री. वराडे काका, सुनंदा काकू व श्री. ज्ञानेश्वर वराडे यांचे आभार मानले. तसेच चि. वेदिकाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व शुभचिंतन व्यक्त केले.


“मातृभूमीच्या सेवेसाठी  सध्या छत्तीसगड येथे कर्तव्य बजावत असलेले CRPF जवान श्री. ज्ञानेश्वर वराडे.” 🇮🇳🫡

                 

वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. चिमुकल्या वेदिकेच्या विचारांनी आणि वराडे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीने "वाढदिवस असा साजरा करावा!" असा आदर्शच समाजासमोर ठेवला आहे.

माजी विद्यार्थीने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे विद्यालय परिसरातून कौतुक होत आहे 


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

मुख्य संपादक श्री नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments