Type Here to Get Search Results !

विटनेर विद्यालयात 'युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा' उत्साहात समारोप!

पंचक्रोशीतील ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकार्य

विटनेर (जळगाव):

दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी (ता. जामनेर) द्वारा संचालित डॉ. निलेश सुभाषचंद्र (जैन) ब्रम्हेचा माध्यमिक विद्यालय, विटनेर येथे आयोजित पाच दिवसीय 'युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा' २६ मे २०२६ रोजी मंगळवारी अत्यंत उत्साहात समारोप करण्यात आला. हे शिबीर २२ मे २०२६ ते २६ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री. पी. एस. बाविस्कर सर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि 'गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव' यांच्या संयुक्त सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात विटनेर परिसरातील व पंचक्रोशीतील एकूण ५५ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता.


विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत; विविध उपक्रमांची झाली सांगता:

समारोप प्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या पाच दिवसांच्या शिबिरामध्ये झालेल्या विविध उपक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने तसेच पर्यावरणातील पक्षी निरीक्षण या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आढावा घेतला. शिबिरादरम्यान दररोज सकाळी लवकर उठून केले जाणारे विविध व्यायाम प्रकार, चहापान, नाश्ता आणि उत्तम भोजन व्यवस्था याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी 'गांधी रिसर्च फाउंडेशन'चे विशेष आभार मानले.



मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक:

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त आणि प्रामाणिकपणा याचा आवर्जून उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे शिपाई आदरणीय श्री. भूषण भाऊ पाटील यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व प्रामाणिकपणाचे गोड कौतुक केले. तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मिळालेल्या अमूल्य सहकार्याबद्दल व मदतीबद्दल विद्यालयाच्या वतीने आभार मानले.



मुख्याध्यापकांचे अध्यक्षीय मार्गदर्शन:

शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. पी. एस. बाविस्कर सर यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिबिरार्थी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

या प्रसंगी शिबिराचे उपशिक्षक आदरणीय श्री. डी. यु. सावकारे सर यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार देणाऱ्या सर्व शिक्षकांचे, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या टीमचे प्रमुख आदरणीय श्री. अब्दुल चाचा यांचे तसेच शिबिरादरम्यान चविष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवणाऱ्या आदरणीय गिरासे सर व इतर सर्व सहकाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

संपादक श्री. नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments