Type Here to Get Search Results !

चिंचोली येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिर उत्साहात संपन्न.११० महिलांनी घेतला लाभ; मोफत औषधे व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

 




चिंचोली, जळगाव:  महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, त्याबाबतची जागरूकता आणि वेळेवर होणारी आरोग्य तपासणी यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिंचोली येथे सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नेरी (ता. जामनेर) यांच्या वतीने मोफत महिला आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ११० महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.





शिबिरामध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. सौ. जागृती सतीश पाटील (M.S., गोल्ड मेडलिस्ट, मुंबई) यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून मासिक पाळीतील समस्या, महिलांचे सर्वसाधारण आरोग्य, स्त्रीरोगविषयक आजार तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



तपासणीदरम्यान आवश्यक असलेल्या महिलांना हॉस्पिटलच्या वतीने मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच अभेदा फाउंडेशन, शिक्षणघर गुलाबी गँग सखी संचालिका वैशाली झाडे चौधरी यांच्या वतीने महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

गावातील सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय सहभाग घेणाऱ्या समाजसेविका उर्मिला घुगे यांनीदेखील शिबिरात उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देऊन कोणतीही आरोग्य समस्या जाणवल्यास वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



या शिबिरात सहभागी झालेल्या ११० महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी नवल परदेशी, विजय लाड, विष्णू घुगे व समाजसेविका उर्मिला घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या आरोग्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

मुख्य संपादक श्री नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments